India Hate Lab (IHL)

Free Press Journal: देशात द्वेषमूलक भाषणांत ६२ टक्के वाढ , वॉशिंग्टनस्थित ‘इंडिया हेट लॅब’चा अहवाल

भारतामध्ये सन २०२३च्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात द्वेषमूलक भाषणांमध्ये ६२ टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल वॉशिंग्टन डीसीस्थित इंडिया हेट लॅब या संस्थेने दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत देशातील मुस्लीमविरोधी भाषणांत वाढ होण्यास हमास-इस्रायल युद्धाचा वाटा मोठा आहे. तसेच ७५ टक्के द्वेषमूलक भाषणांच्या घटना भाजपशासित राज्यांत होत आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.

हा अभ्यास करताना इंडिया हेट लॅबने संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) तयार केलेली द्वेषमूलक भाषणांची (हेट स्पीच) व्याख्या वापरली. त्यानुसार एखादी व्यक्ती किवा गटाविरुद्ध धर्म, वंश, राष्ट्रीयता किंवा लिंग यांच्या आधारावर पूर्वग्रहदूषित किंवा भेदभाव करणारी भाषा वापरणे म्हणजे द्वेषमूलक भाषण करणे होय. हा अहवाल तयार करण्यासाठी इंडिया हेट लॅबने हिंदू गट आणि नेत्यांच्या ऑनलाईन कारवायांचा आढावा घेतला, समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आलेल्या भाषणांचे व्हिडीओ तपासले आणि भारतीय प्रसारमाध्यमांनी वृत्तांकन केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांच्या घटनांचे संकलन आणि विश्लेषण केले. त्यानुसार भारतात २०२३ साली मुस्लीमविरोधी द्वेषपूर्ण भाषणांच्या ६६८ घटना घडल्या. त्यातील २५५ घटना या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत घडल्या, तर ४१३ घटना वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यांत घडल्या. वर्षभरातील एकूण घटनांपैकी ७५ टक्के (म्हणजे ४९८ घटना) भारतीय जनता पक्षाचे शासन असलेल्या राज्यांत घडल्या. द्वेषपूर्ण भाषणांच्या बहुतांश घटना महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांत घडल्या आहेत.

Read More